मुंबई (वृत्तसंस्था) : केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानं समाजात अतिशय संतप्त भावना आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे, असंही ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणाबाबत आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली, त्या नंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं. ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचं ते म्हणाले.ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णयाबद्दलही त्य़ांनी माहिती दिली.