मुंबई (वृत्तसंस्था) : केवळ निवडणुका लढवण्यासाठी स्वबळाचा उद्घोष नसावा तर, न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळाची गरज असते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या ५५ व्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधतांना सांगितलं.
१९ जून १९६६ रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही परिस्थितीत लाचार होणार नाही तर स्वाभिमानानं आणि स्वत:च्या पायावर खंबीरपणे पुढची वाटचाल करेल असं सांगून ते म्हणाले की स्वबळ काय असतं ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलं आहे.
सध्याची वेळ कुरघोडीच्या राजकारणाची नसून आर्थिक आणि आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याची आहे असं ते म्हणाले. हिंदुत्व हा राष्ट्रीय अस्मितेचा भाग असून ती कोणा एकाची मिरास नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना केवळ राजकीय पक्ष नव्हे तर सामान्य मराठी माणसाला बळ देणारी संकल्पना आहे असं ठाकरे म्हणालेे. कोविडकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशासनाचं तसंच शिवसेना कार्यकर्त्यांचं त्यांनी कौतुक केलं.
मुख्यमंत्र्यांचा कालचा संदेश केवळ देखावा असल्याची टीका विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्यात शिवसेना स्वबळावर सत्तेत येऊ शकत नसल्यानं एकत्र येण्याची भाषा मुख्यमंत्री बोलत आहेत असं ते म्हणाले.