नवी दिल्ली : अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना वैविद्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी 5 सप्टेंबर या ‘राष्ट्रीय शिक्षक दिनी’ देशातील शिक्षकांना उल्लेखनीय योगदानासाठी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने’ गौरविण्यात येते. वर्ष 2018 साठी महाराष्ट्रातून या पुरस्काराकरिता अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांची निवड झाली आहे. विज्ञानभवनात आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात डॉ.बागुल यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रजतपदक, मानपत्र आणि 50 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
एकाच शैक्षणिक वर्षात राबविले 276 शैक्षणिक उपक्रम
डॉ.अमोल बागुल हे उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी एकाच शैक्षणिक वर्षात 276 शैक्षणिक उपक्रम राबविण्याची किमया केली आहे. कवि मनाच्या या शिक्षकाने जागतिक मराठी भाषादिनी अभ्यासक्रमातील कवितांचे 77 सार्वजनिक ठिकाणी गायन केले. बासरीवादनातही आपला ठसा उमटविणाऱ्या डॉ.बागुल यांनी 7 हजार 500 विद्यार्थ्यांना बासरीवर राष्ट्रगीत शिकविले आहे. वर्ल्ड टिचर फोरममध्ये सक्रीय असलेले डॉ.बागुल यांनी या माध्यमातून 121 देशातील 5 हजार शिक्षकांमध्ये होत असलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणि संकल्पनांच्या आदान-प्रदानात सहभाग घेतला आहे. त्यांनी 9 पुस्तके लिहिली आहेत. अमेरिकेतील हनिबेल स्पेस अकॅडमी आणि नासा स्पेस कँपसाठी त्यांची निवड झाली होती. त्यांनी 200 हून अधिक शैक्षणिक प्रशिक्षण घेतले असून 50 हून अधिक विशेष अभ्यास कार्यक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. वर्ष 2011 च्या जनगणना कार्यक्रमातील उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना जनगणना राष्ट्रीपती पदक मिळाले आहे.
डॉ.बागुल हे 30 अनाथ, वंचित मुलांचा सांभाळ करीत आहेत. दुष्काळग्रस्त 22 गावांना पाणी वाटप करून वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे कौतुक झाले आहे. डॉ.बागुल हे उत्तम व्याख्याते आहेत, रांगोळी कलेतही ते पारंगत आहेत.
डॉ.बागुल यांच्या शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना मानाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.