नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूंमध्ये शिस्त, झोकून देण्याची वृत्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, स्पर्धा करण्याची क्षमता दिसते. नव्या भारताचीही हीच वैशिष्टे आहेत. म्हणून हे खेळाडू नव्या भारताचे प्रतिनिधी आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

प्रधानमंत्र्यांनी काल आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.  खेळाडूंनी अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता केवळ आपलं शंभर टक्के योगदान द्यावं, असा सल्ला देत, या स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या.

तिरंदाजी या क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या प्रवीण जाधव आणि त्याच्या आईवडीलांशी त्यांनी मराठीतून संवाद साधला. खडतर परिस्थिती असतानाही, प्रवीण याचा आजवरचा प्रवास आणि त्याला कुटुंबियांनी केलेलं सहकार्य प्रेरणादायी असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं.