मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा हाच ओबीसी समाजाचा खरा पक्ष असून ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटले आहे. भाजपाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक आणि ओबीसी जागर अभियानाचा आरंभ मुंबईत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

देशाच्या मंत्रिमंडळात सर्वात जास्त ओबीसी मंत्री असून मोदींच्या नेतृत्वात देशात बहुजनांचे राज्य आहे, असे फडनवीस म्हणाले. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ओबीसी समाजासाठी अनेक स्तरावर विविध योजना कार्यान्वित आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, असा आरोप त्यांनी केला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते. भाजपा संपूर्ण राज्यात ओबीसी जागरण अभियान राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातले काही मंत्री या संदर्भात असत्य बोलत आहेत, असा आरोप त्यांनी केला. आरक्षण रद्द झाले असले तरी ओबीसींसाठी राखीव मतदारसंघात भाजपा ओबीसी उमेदवारच उभा करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.