नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत काल कोलम्बो येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या या मालिकेत एक-शून्य अशी आघाडीही घेतली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद २६२ धावा केल्या. चमिका करुणारत्नेने सर्वाधिक ४३ धावा केल्या. भारताकडून दीपक चहर, युजवेन्द्र चहल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.  विजयासाठी २६३ धावांची लक्ष्य भारताने ८० चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले.

कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावा केल्या. आपला पहिलाच एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या ईशान किशनने ४२ चेंडूत ५९ धावांची चमकदार खेळी केली. २४ चेंडूत ४३ धावांची तडाखेबंद खेळी करणारा पृथ्वी शॉ सामनावीर ठरला.या मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.