पु.ल. गौरव दालनास दिली भेट
मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेशाचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. पूजेनंतर प्रधानमंत्री मोदी नागरिकांच्या “..मोदी…मोदी..” च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी थेट मोटारीत न बसता चालतच संघाच्या बाहेर आले..आणि त्यांनी .”..अभिवादनाला हात जोडून, हात उंचावून प्रतिसाद देताच परिसर ‘..भारत माता की जय !‘ च्या घोषणांनी दणाणून गेला.
पारले येथील लोकमान्य सेवा संघाच्या श्री गणेश उत्सवातील श्री गणेशाचे विधीवत पूजन केले. त्यानंतर संघाच्या सभागृहातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रधानमंत्री मोदी यांच्यासमवेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाचे दर्शन घेवून लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.
संघाने उभे केलेल्या पु.ल. गौरव दालनास प्रधानमंत्री मोदींनी भेट दिली. याठिकाणी पु.लंच्या साहित्यकृती, काही दस्तऐवज, लेखन-सामुग्री आणि वस्तू, छायाचित्रांचे जतन करण्यात आले आहे. या मौलिक संग्रहाची प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आस्थेने माहिती घेतली. त्यांनी अतिथी हस्ताक्षर पुस्तिकेत अभिप्रायही नोंदविला.
“..पु.ल. म्हणजे हसू..मग तुम्ही या दालनात आल्यावर हसता ना?” असा मिश्किल प्रश्नही त्यांनी संघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, दीपक घैसास, उदय तारदाळकर यांनी स्वागत केले तसेच सेवा संघ आणि पु.ल. देशपांडे गौरव दालनाची माहिती दिली.