मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते.
बरेच जण म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे संकट आलं आहे. काही भागात आजही पाऊस नाही, पण काही भागांत खूप पाऊस पडला. काही ठिकाणी ४ दिवसांत ४०० मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. काहींच्या मते अतिक्रमित बांधकामांमुळे हे झालं. त्यामुळे अतिक्रमण हटवण्याचं पाऊल उचललं जाणार आहे. यात चालढकल करणाऱ्या किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
अलमट्टी धरणाविषयी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा करत आहेत. दोन्ही राज्यांकडून समन्वयानन उपाय योजण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. आम्ही समिती नेमली होती की खरंच अलमट्टीमुळेच या घटना घडतात का? याविषयी तज्ज्ञ समितीन अहवाल दिला होता. त्यात असं काही होत नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला होता, असं अजित पवार म्हणाले.
कोल्हापुरात सध्याच्या मोऱ्या ब्रिटिशकालीन आहेत. त्याचा आकार कमी आहे. बऱ्याचदा गाळ, दगड किंवा झाडं वाहून आल्यामुळे या मोऱ्या बंद होतात. त्यामुळे आता पाईप मोऱ्यांऐवजी बॉक्स किंवा स्लॅबच्या मोऱ्या बांधल्या जातील. पावसाळा संपला की बॉक्स किंवा स्लॅब प्रकारचे पूल बांधले जातील, असंही ते म्हणाले.