नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या नवबाधितांची संख्या २९ हजारांपेक्षा जास्त असली तरी; तब्बल एकशे ३२ दिवसांनंतर ही संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ३ लाख ९८ हजार शंभर झाली आहे. एकशे २४ दिवसानंतर उपचाराधीन रुग्णांची ही संख्या ४ लाखांच्या खाली नोंदवली गेली आहे. काल दिवसभरात ४२ हजार तीनशे ६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ६ लाखांहून अधिक रुग्ण या आजारातून बरे झाले आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३९ शतांश टक्के झालं आहे तर रुग्ण वाढीचं प्रमाण १ पूर्णाक ७३ शतांश टक्के आहे.

काल दिवसभरात या आजारानं चारशे १५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत या आजारानं दगावलेल्यांची एकंदर संख्या ४ लाख २१ हजार तीनशे ८२ झाली आहे. कोरोना चाचण्यांच्या संख्येतही वाढ होत असून आतापर्यंत ४५ कोटी ९१ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल १७ लाख २० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या.

देशात कोविड १९ प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत ४४ कोटी १९ लाखांपेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात ६६ लाखांपेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.