नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्राच्या उभारणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व असून आधुनिक शिक्षणाला देशाच्या समृद्ध परंपरेची जोड आवश्यक आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं. श्रीनगरमध्ये काश्मीर विद्यापीठाच्या एकोणिसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीरला एक समृद्ध संस्कृती आणि परंपरा आहे आणि इथल्या युवा पिढीनं त्यापासून प्रेरणा घ्यावी असं अवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या ४ दिवसांच्या जम्मू आणि काश्मिरच्या आणि लदाखच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी करगिल विजय दिनानिमित्त बारामुल्ला इथं भेट देऊन देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना आदरांजली वाहिली.