नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट, २०१९ मध्ये याच दिवशी, पूर्वीच्या जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७०च्या तरतुदी केंद्र सरकारनं रद्द केल्या. राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख अशा आणखी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले. यापूर्वी ३७० कलम मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार स्वतंत्र घटना असलेले जम्मू आणि काश्मीर हे एकमेव राज्य होतं, अर्थात राज्याला विशेष स्वायत्त दर्जा देणारी ही तात्पुरती तरतूद होती. आता कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशात सर्व केंद्रीय कायदे तसंच विविध कल्याणकारी योजना लागू आहेत. याबरोबरच या प्रदेशातील विकासाची क्षमता वाढण्यासाठी गुंतवणुकीचा मार्गही मोकळा झाला आहे. वाढत्या गुंतवणुकीमुळं रोजगार निर्मिती वाढेल तसंच सामाजिक-आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल.