नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश सुनिश्चित करून किसान रेल्वेनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठाच दिलासा दिला आहे. किसान रेल्वे सुरू होऊन काल १ वर्ष पूर्ण झाले. देवळाली ते दानापूर अशी भारताची पहिली किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाली आणि पुढे ती मुजफ्फरपूर पर्यंत वाढविण्यात आली. यानंतर, सांगोला इथून किसान लिंक रेल या किसान रेल्वेला जोडली गेली आणि त्रि-साप्ताहिक करण्यात आली. जबरदस्त प्रतिसादामुळे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रोत्साहित होऊन देशाच्या विविध भागांमध्ये वेळापत्रकानुसार चालविण्यात येण्या-या किसान रेल्वेच्या ५ अधिक सेवा सप्ताहात एकूण ११ फे-यांसह सुरू करण्यात आल्या.

किसान रेल्वेची मागणी वाढल्यामुळे भारतीय रेल्वेनं आता इंडेंट आधारित किसान रेल्वे सुरू केली आहे. गेल्या एक वर्षात, मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या ४८६ फेऱ्यांमध्ये फळे आणि भाजीपाला यासारख्या १,६२,८८१ टन नाशवंत शेतमालाची वाहतूक केली. किसान रेल्वे ट्रेनद्वारे डाळिंब, द्राक्षे, संत्री, केळी, लिंबू, टोमॅटो, सीताफळ, पेरू, बेर, कांदा, बटाटा, शिमला मिर्च, चिकू, गाजर इत्यादींच्या मुख्यतः पिकाची किंवा शेतमालाची वाहतूक केली जाते. त्यामुळे सांगोला देवळालीपासून नागपूर गोंदिया पर्यंतच्या रेल्वे मार्गालगतच्या भागातील शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.