HRL

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉकीसारख्या पारंपरिक भारतीय खेळाला गतवैभव मिळवून देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. राज्य सरकारे आणि उद्योग जगतानं पुढे येत भारतीय खेळांना आवश्यक ते प्रोत्साहन द्यावं, असंही ते म्हणाले. दिवंगत समाजसेवक आणि राष्ट्रवादी नेते श्री चमनलालजी यांच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती निवासात टपाल तिकीटाचं त्यांनी काल प्रकाशन केलं, त्यावेळी ते बोलत होते. टोकियो ऑलिंपिकमधील भारतीय हॉकी संघाच्या कामगिरीनं खेळांमधली रुची पुन्हा जिवंत केली आहे. हॉकी, कबड्डी यासारख्या पारंपरिक भारतीय खेळांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे, असंही ते म्हणाले. यासाठी प्राथमिक स्तरापासून, कृत्रिम हिरवळ (टर्फ), प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यासह पायाभूत सुविधा अधिक सक्षम करायला हव्यात असंही ते म्हणाले. केंद्र सरकार भारतीय खेळांना देत असलेल्या प्रोत्साहनाची नायडू यांनी प्रशंसा केली.