नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या ९ व्या हप्त्याचं वाटप करण्यात आलं. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात ९ कोटी ७५ लाखांहून अधिक लाभार्थीं शेतकऱ्यांना १९ हजार ५०० कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं.

रत्नागिरीच्या देवेंद्र झापडेकर यांच्या सह अनेक राज्यांमधल्या लाभार्थी शेतकाऱ्यांशी मोदी यांनी संवाद साधला. आगामी २५ वर्षात शेती, शेतकरी आणि गावांचं महत्वपूर्ण योगदान आपल्या देशाला एक वेगळ्या पातळीवर नेणार असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. आत्तापर्यंतची सर्वात मोठी शेत मालाची खरेदी चालू हंगामात सरकारनं केली आहे. आपण डाळ आणि खाद्य तेल उत्पादनातही आत्मनिर्भर होणं गरजेचं असून, आपला शेतकरी हे करू शकतो असा विश्वास मोदी यानी व्यक्त केला.

कृषी निर्यातीत पहिल्यांदाच आपलं देश जगातल्या पहिल्या १० देशांमध्ये पोचला आहे, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्त ताकद देण्याचा आणि स्वतंत्र करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असून देशातल्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपलं उद्दीष्ट असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.