नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या १५ ऑगस्टपासून उपनगरी रेल्वे गाड्यांमधून प्रवास करता येईल. दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना ही मुभा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल समाज माध्यमावरुन जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील. तर ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून, तसंच उपनगरी रेल्वे स्थानकांमधून फोटो पास घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासवर क्यू आर कोड असतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपाहार गृहं, मॉल, प्रार्थनास्थळं यांच्याबाबत टास्कफोर्सशी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख लोक बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीनं राज्य शासनानं आपली तयारी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. दरडप्रवण, पूरग्रस्त भागातल्या नागरिकांसाठी सर्वंकष कायमस्वरूपी धोरण आखणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.केंद्र सरकारनं १०२ व्या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली, पण आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटत नाही तोपर्यंत या प्रस्तावाचा उपयोग नसल्यानं ही मर्यादा उठवावी आणि राज्याला आरक्षणाचे अधिकार द्यावेत अशी मागणी प्रधानमंत्र्यांकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राकडे इंपेरिकल डेटाची मागणी केली असल्याचंही ते म्हणाले.