नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारनं यंदाच्या साखरहंगामासाठी उसाचा एफआरपी अर्थात रास्त दर प्रति क्विंटल २९० रूपये केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं त्यासाठी मंजुरी दिली आहे. १० टक्के बेसिक रिकव्हरीला हा दर मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रिकव्हरीसाठी दर १ दशांश टक्के वाढीवर प्रति क्विंटल २ रूपये ९० पैसे प्रिमियम मिळेल, तर १० टक्क्यापेक्षा कमी रक्कम असेल तर एफआरपीमधे याच प्रमाणात घट होईल. साडेनऊ टक्क्यापेक्षा कमी रिकव्हरी असलेल्या साखर कारखान्यांच्या बाबतीत कपात न करता प्रति क्विंटल २७५ रूपये ५० पैसे भाव दिला आहे. गेल्या हंगामात हा भाव २७० रुपये ७५ पैैसे प्रतिक्विंटल होता. येत्या १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या साखर हंगामात हे दर लागू होतील.