नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल रात्री जामिनावर सुटका झाली. त्यांचा जामीन मंजूर करताना महाड इथल्या न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांना रायगड पोलिसांसमोर उपस्थित राहावं लागेल. राणे यांच्या वकिलांनी बातमीदारांना ही माहिती दिली. १५ हजार रुपयांच्या व्यक्तीगत जात मुचलक्यावर राणे यांना जामीन मिळाला आहे. मात्र पुराव्याची छेडछाड न करणं, साक्षीदारांवर दबाव न आणणं, भविष्यात गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेणं अशा अटी न्यायालयानं घातल्या आहेत.
नारायण राणे यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे असतील तर त्यांना सात दिवसांची नोटीस दयावी असा आदेशही न्यायालयान पोलिसांना दिला आहे. यानंतर सत्यमेव जयते असे ट्विट करुन राणे यांनी त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच कालच्या प्रसंगामध्ये पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
राणे यांची तळकोकणातली जनआशीर्वाद यात्रा भाजपा प्रदेश कार्यकरिणीनं काही दिवस पुढे ढकलली आहे, भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज कणकवली इथं वार्ताहर परिषदेत बोलतही माहिती दिली. तांत्रिक अडचणीमुळे यात्रा पुढे ढकलली असून दोन दिवसांत यात्रेचं सुधारित वेळापत्रक कळवलं जाईल, असं तेली यांनी सांगितल. राणे यांच्या अटकेबाबत पोलिसांवर दबाव टाकतानाचा परिवहन मंत्री अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राणे यांना झालेली अटक सूडबुद्धीनं केल्याचं सिद्ध होतं असा आरोप तेली यांनी केला.