मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ वैभव मिळवून देतानाच आधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यासाठी ६१ कोटी ५० लाख रुपये खर्चाचा आराखडा पुरातत्त्व विभागाच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे, या आराखड्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नुकतीच मंजुरी दिली.

अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा शासनाच्या विधी आणि न्याय विभागाकडे या आठवड्यात पाठवला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी काल दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ हेमाडपंती रूप देण्यासाठी दगडांची झीज झालेल्या ठिकाणी रासायनिक लेपन करून दगडांचे संवर्धन केले जाणार आहे. मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम होणार आहे.

विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाइट काढून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराचे आरसीसी बांधकाम पाडून तिथं मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनविले जाणार आहे. मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून शेजारी एक स्कायवॉक तयार केला जाणार आहे.

शेवटच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा, विद्युतीकरण आणि वातानुकूलित यंत्रणा आदी कामे केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले. सर्व कामे पाच वर्षांत करण्यात येणार असून, देणग्यांसाठी मंदिर समितीने आवाहन केलं आहे.