नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू काश्मीरमधील सांबा-जम्मू आणि अखनूर-पूंछ या २ हजार ५५६ कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. जख कुंजवानी प्रभागातील राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या सहा पदरी द्रुतगती मार्गाच्या विकासकामालाही त्यांनी मंजुरी दिली. कुंजवानी ते चौथा तावी पूल प्रभागाचा यात समावेश आहे. यासाठी १८२१ कोटीची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे.

जख कुंजवानी हा भाग पठाणकोट जम्मू राष्ट्रीय महामार्गाचा भाग असून या सहा पदरी मार्गामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल. अखनूर पूछ मार्गावरील भिंबेर गली बोगद्याच्या बांधकामासाठी तसंच या मार्गावरील दुपदरीकरणासाठीही ७३४ कोटी रुपये खर्च करण्याचा महत्वाचा निर्णय गडकरी यांनी घेतला आहे.

या बोगद्यामुळे अखनूर आणि पूंछमधील अंतर कमी होऊन राजुरी आणि पूंछ मधील स्थानिक लोकाना याचा लाभ होईल.