मुंबई जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार 

मुंबई : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिली. जिल्हा सैनिक कार्यालय येथे आज माजी सैनिकांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, माजी सैनिक कुटुंबियांसह उपस्थित होते.

शासनाच्या उद्योग विभागाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधून नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक लाभार्थींना 10 लाखापासून 50 लाखापर्यंत भांडवल देण्याची सोय केली आहे. या योजनेचा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने लाभ दिला जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष लोकशाही दिन आयोजित करण्यात यावा व त्यातील समस्या शासनाने सोडवाव्यात असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र शासनाद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची यावेळी माहिती देण्यात आली तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.