मुंबई (वृत्तसंस्था) : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आयोजित गृह विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी पूर्ण पाठबळ दिलं जाईल, असं ते म्हणाले. निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकार यांना संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालावा, इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी, जलदगती न्यायालयांतून निकाल लागल्यानंतर शिक्षेची अमंलबजावणी आणि पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करावी, महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. राज्याच्या शक्ती कायद्याबाबतचा संयुक्त समितीचा अहवाल, आगामी विधिमंडळ अधिवेशनात सादर केला जाईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या बैठकीत सांगितलं.