मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामीण जनतेत शौचालय वापराचं महत्त्व बिंबवण्यासाठी विविध जनजागृतीचे विविध उपक्रम राबवावेत अशी सूचना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन च्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. बैठकीत पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला प्रतिव्यक्ती ५५ लिटर पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून कृती आराखड्यात घेण्यात आलेल्या सर्व नळ योजनांची कामे अधिक गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. घरोघरी शौचालय उपलब्ध असतानाही ते न वापरणाऱ्या ग्रामस्थांना नोटीसा द्याव्यात तसंच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी प्रशासनास केल्या. आमदार कैलास पाटील आणि शासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते.