मुंबई (वृत्तसंस्था) : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन केले जात आहे. आज एकट्या मुंबईत ५० हजारांपेक्षा जास्त गणेश मुर्तिंचं विसर्जन केले जाईल.
मुंबईत महापालिकेतर्फे विशेष उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मुंबईतल्या प्रमुख विसर्जन स्थळांवर ७१५ जीवरक्षक तैनात केले आहेत. १८५ नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याबरोबरच जीव रक्षक नौकाही तैनात केल्या आहेत. नैसर्गिक पाणवठ्यांव्यतिरिक्त कृत्रिम तलाव, फिरती मुर्ती संकलन वाहने, फिरते विसर्जन तलाव आदी उपाययोजना पालिकेतर्फे केल्या आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी सज्ज आहे. राज्यात सर्वच भागात अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी नगरपरिषदेच्या वतीने पाच वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही वाहने गल्लोगल्ली फिरत असून घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जनासाठी संकलन करत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीच्या वतीने अशाच पध्दतीच्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला आहे. शहरातल्या तीन नद्यांच्या काठी अधिकृत २८ विसर्जन स्थळे असून, ४६ कृत्रीम तलावांची निर्मिती केली आहे.
वाशिम जिल्ह्यात गणेशमुर्ती विसर्जनाला सकाळी १० वाजल्या पासून सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक निघणार नसल्यानं वाशिम नगर पालिकेनं शहरातल्या विविध भागात २५ सजलेल्या ट्रॅक्टरट्रॉली ठेवल्या आहेत. ज्यात विसर्जन केलं जाईल.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनासाठी सोलापूर शहारत विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहेत.
नांदेड शहरात अत्यंत शांतता आणि साद्या पध्दतीनं गणेश विसर्जन केलं जात आहे. अनेक नागरिकांनी घरगुती गणपती सार्वजनिक गणेश मंडळाकडे विसर्जनासाठी जमा केले तर आज गोदावरी आणि आसना नदीत प्रदूषित होऊ नये म्हणून शहर बाहेर बारा ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
धुळे शहरासह जिल्ह्यात घरगुती आणि सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होत आहे. महापालिकेनं धुळ्यात ३७ ठिकाणी विसर्जनाची सोय केली आहे. प्रत्येक प्रभागात गणेश मुर्तीचे संकलन करुन त्यांचे सामुहिक विसर्जन करण्यासाठी महापालिकेनं पथकं नियुक्त केली आहेत.