नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे ‘स्वच्छता ही सेवा 2019’ चा प्रारंभ केला. स्वच्छतेविषयी देशव्यापी जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत प्लॅस्टीक कचरा जागृती आणि व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला असून 11 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2019 या काळात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धविकास, पेयजल विभाग आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केला.

पशुधन आरोग्य विज्ञान मेळ्यालाही पंतप्रधानांनी भेट दिली. गायीच्या पोटातून प्लॅस्टीक कचरा कसा बाहेर काढला जातो याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. प्लॅस्टीक कचऱ्याचे पुनर्वापर करता येण्याजोगं आणि पुनर्वापरासाठी योग्य नसलेले प्लॅस्टीक असे वर्गीकरण करणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या महिला गटाशी पंतप्रधानांनी संवाद साधला. सर्व नागरिकांनी आपले घर, कार्यालय एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टीकपासून मुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, सरपंच, महिला गट आणि स्वच्छाग्रहींसमोर ते बोलत होते.