जम्मू आणि काश्मीरमधील सरपंचांशी साधला संवाद

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे विविध योजना आणि स्थानिक संस्था मजबूत करण्यासंबंधी 73 आणि 74  व्या घटनात्मक सुधारणा राबवण्याचा मार्ग सुकर होऊन तिथल्या विकासाला गती मिळेल असे उपराष्ट्र्पती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

नवी दिल्लीत आज जम्मू आणि काश्मीरच्या सरपंच आणि पंचायत सदस्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले की, कलम 370 ही घटनेतील तात्पुरती आणि क्षणिक तरतूद होती.

जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटीत झालेल्या पंचायती निवडणुकांमध्ये 74 टक्के मतदान झाले आणि  4,483 पैकी 3,500 पंचायती निवडल्या गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

३७० वे कलम रद्द केल्यामुळे पंचायती अधिक गतिमान होतील कारण त्यांच्याकडे निधी आणि कामे वळतील. तसेच पंचायतींची आर्थिक ताकदही १० पटीने वाढवण्यात आल्याचे ते म्हणाले.

कर वाढवून संसाधने वाढवण्याचे अधिकार पंचायतीकडे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

14 व्या वित्त आयोगाने निर्धारित केलेल्या मापदंडानुसार पंचायत निवडणुका घेतल्या नसल्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ते म्हणाले. मात्र आता निवडणूक झाल्यामुळे निधी यायला सुरुवात होईल. 500 कोटी रुपये देण्यात आले असून आणखी 3 हजार कोटी रुपये लवकरच दिले जातील असे नायडू म्हणाले.

दर पाच वर्षांनी स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेणे अनिवार्य करण्याची सूचना उपराष्ट्रपतींनी केली.

केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच पाकिस्तानशी चर्चा केली जाईल आणि देशाची सुरक्षा आणि अखंडता याला प्रत्येक भारतीयांचे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.