पुणे : पुणे शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात दिली.गडकरी काल पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते.

यावेळी पुण्यातील २ हजार २१५ कोटी रुपयांच्या २२१ किलोमीटर लांबीच्या २२ प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या रिंग रोडचं भूमी अधिग्रहण राज्य सरकारनं करावं, केंद्र सरकार या प्रकल्पाचा सर्व खर्च करून तो पूर्ण करेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.गडकरी यांच्या हस्ते काल सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम या दुमजली उड्डाणपुलाच्या कामाचं आणि कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे भूमिपूजन झालं.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.पुणे शहरातील हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे वाढवायला हवं.ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी गाड्यांचे हॉर्न हे भारतीय वाद्यांच्या आवाजाचे असावेत अशी सूचना केल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

पुणे शहरातील मेट्रो रेल्वे, विमानतळाचे विस्तारीकरण आणि जायका नदी सुधार प्रकल्प हे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या येणार असून त्यासाठी इथेनॉल पंपांची संख्या वाढवा अशी सूचना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. तसंच पुणे ते बेंगलोर हा सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचा नवीन महामार्ग तयार करण्यात येणार असून या महामार्गाभोवती नवीन पुणे वसवून ते पुणे शहराशी मेट्रोने जोडावं अशी सूचनाही त्यांनी केली. वाघोली ते शिरूर या रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचा नवीन आराखडा तयार करण्यात आला असून तळेगाव ते अहमदनगर या मार्गासाठी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

बारामती ते फलटण हा नवीन मार्ग मंजूर करण्यात आला असून रत्नागिरी ते कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या २४०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. दिल्ली ते चेन्नई हा १२७० किलोमीटरचा नवीन रस्ता तयार करण्यात येत असून त्याची महाराष्ट्रातील लांबी पाचशे किलोमीटर आहे.

सूरतहुन, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट या शहरातून हा महामार्ग जाणार असून त्यामुळे पुणे बेंगलोर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.इथे ट्रॅफिक खूप जास्त आहे त्यामुळे त्या अधिकार्यांना सूचना केली आहे की डबल डेकर उड्डाण पूल बांधता आला तर जरूर त्यातून मार्ग कसा काढता येईल, नवीन टेक्नोलॉजिचा वापर करून, तो हि प्रयत्न नक्की आम्ही करू….मला कल्पना आहे की इथे पुणे सातारा रस्ता हा अडचणीचा झाला होता. या रस्त्यावर अनेक अॅक्सिडेंट व्हायचे, सुप्रिया ताईंनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आता मार्ग निघालेला आहे आणि त्या रस्त्याचा टोल टर्मिनेट केलेला आहे.

५० कोटी रुपये देऊन येत्या डिसेंबर मध्ये हा रस्त्याचं काम जवळपास मार्गी लागेल, पूर्ण होईल आणि त्याच्याबरोबर एका अतिशय उत्तम संस्थेकडून या रस्त्याचं आम्ही अॅक्सिडेंट च्या बाबतीमध्ये देखील अभ्यास करतोय आणि निश्चितपणे हा रस्ता चांगला होईल असं मला विश्वास आहे.