बारामती  : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी बारामती परिसरातील विकासकामांची पाहणी केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आदी उपस्थित होते.

विकासकामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत. सर्व कामे दर्जेदार आणि गतीने होणे आवश्यक आहे. निधीची आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत. सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होणे अपेक्षित आहेत. पर्यटकांना आकर्षण वाटेल अशा पद्धतीने कामे करावीत आणि त्यासाठी परिसरात वृक्षारोपण करावे असे त्यांनी सांगितले.