माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे पिढ्यानपिढ्या साजऱ्या होणाऱ्या सण उत्सवांतून दिसून आले आहे. वेगवेगळ्या भाव-भावना व्यक्त करणं, एकमेकांसोबत वाटणं, हे वरदान मनुष्यप्राण्याइतके इतर कोणातही ठळकपणे दिसून येत नाही. आनंद, दु:ख, सुख, प्रेम, राग, भीती इ.भावना बोलून, नाच-गाण्यांच्या माध्यमातून सामुदायिकपणे साजऱ्या करण्याची परंपरा मनुष्यप्राण्यात आदिकाळापासून दिसते. सुरुवातीला निसर्गाशी आणि आसपासच्या परिसराशी नातं जोडत, सुरु झालेला हा उत्सावांचा प्रवास आज आधुनिक तंत्रयुगातही मोठ्या उत्साहात सुरु आहे.
आपल्या संस्कृतीतले सण, उत्सव निसर्गालाही सामावून घेणारे आणि म्हणूनच अनोखे ठरतात. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास श्रावण महिना हा सर्व उत्सवांचा लाडका महिना! किंबहुना आपल्या सणांची खऱ्या अर्थाने सुरुवात सृजनापासून होते. आषाढसरीनीं धरतीमातेला चिंब भिजवून नव्या लावणीसाठी तयार केलं असतं. धरतीच्या कुशीतून नुकतेच बाहेर अंकुर लागलेले सृजनाचे कोंब श्रावणधारांत डोलत असतात, बहरत असतात. या कोवळ्या अंकुरांचे स्वागत आणि कौतुक नागपंचमी, श्रावणपौणिर्मा, गोकुळाष्टमी, पोळा या सणांतून आणि श्रावणी सोमवार, मंगळागौर, शुक्रवार, पिठोरी अमावस्या या व्रतांच्या माध्यमातून केलं जातं. श्रावण सोमवारी शिवशंकराला बेलाचे पान आणि पत्री वाहून पूजन केलं जातं. मंगळागौरीला तर विविध औषधी, उपयुक्त वनस्पतींच्या पत्री आणि तऱ्हेतऱ्हेची फुले यांना विशेष महत्व असतं. निसर्गातील वनस्पतींच्या, फुलांच्या विविधतेचा, सौदर्याचा आनंद सहजपणे या सणांतून घेता येतो.
बैलापोळा हा तर खास शेतीप्रधान संस्कृतीचा सण. शेतीच्या कामासाठी आणि दैनंदिन जीवनातील गायी-बैलांचे महत्त्व ओळखून त्याची जाण ठेवण्याचा हा सण. नागपंचमी हा सुध्दा निसर्ग, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य यांच्यातील नाते दृढ करणारा सण. निसर्गाचा समतोल राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नागांचे रक्षण या निमित्ताने करता येते.
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवात तर निसर्ग आणि मानवाचा अन्योन्य संबंध अधिक दृढ करण्यात येतो. मातीपासून तयार केलेल्या सुबक गणेशमूतींर्ना नैसगिर्क रंग, फुलं, पानं यांचा साज चढवला जातो. आरास करण्यासाठी बांबू, लाकूड अशा नैसगिर्क वस्तूंचा उपयोग केला जातो.
गणेशपूजनात सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या २१ प्रकारच्या पत्रींचे औषधी उपयोग सर्वश्रृत आहेत. मधुमालती, माका, बेल, दूर्वा, बोर, धोतरा, तुळस, आघाडा, शमी, केवडा, कण्हेर, आपटा, रुई, अर्जुन सादडा, विष्णुक्रांत, डाळिंब, देवदार, मारवा, निर्गुडी, जाई, अगस्ती या त्या बहुगुणी पत्री. या सर्व पत्रींचे विविध औषधी उपयोग आहेत आणि पूर्वानुभवावरुन ते माहित असलेल्या आपल्या पूर्वजांनी पुढच्या पिढीपर्यंत ते नेण्यासाठी गणेशपूजनात त्यांना महत्वाचे स्थान दिले आहे. गणेशोत्सवात करण्यात येणारे विविध खाद्यपदार्थही त्या ॠतुनुसार आवश्यक आणि उपयुक्त असेच आहेत. हे सर्व लक्षात घेऊन श्रावण, भाद्रपद महिन्यातील हे सण साजरे करणं आवश्यक आहे. ध्वनि-जल-वायू प्रदूषण, वनस्पतींची नासाडी, पर्यावरणाची हानी होईल असे प्रकार टाळायला हवेत.
सण-उत्सव हे आनंद घेण्यासाठी आणि देण्यासाठी आहेत याचं भान कायम बाळगायला हवं. येणाऱ्या गणेशोत्सवात काय करावे आणि काय टाळावे याचा थोडक्यात आढावा घेऊया.
सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. देश-विदेशातील पर्यटक खास गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी या काळात महाराष्ट्रात येत असतात. गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन ते सुध्दा एक नवी ऊर्जा आणि भारतीय संस्कृतीची अनोखी ओळख सोबत घेऊन जातात.
शतकभरापूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरु करता असताना त्यावेळी देशात असलेल्या पारतंत्र्यांचे जोखड झुगारुन देण्यासाठी समाजमन एकवटणे हा मुख्य उद्देश योजला होता. सामूदायिक मन निर्माण करताना जाति-धर्म-पंथभेद गळून पडावे, सामाजिक अभिसरण व्हावं, जनसमुदायात मोकळेपणाने संवाद व्हावा, एकमेकांची संस्कृती जाणून घेता यावी हे हेतूही या उत्सवाने मोठ्या प्रमाणावर साध्य केल्याचं दिसतं. मुंबई सारख्या महानगरात तर देशभरातून सामावलेले नागरिक अतिशय श्रध्देने आणि उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात. अनेक अमराठी लोकही ‘सुखकर्ता-दु:खहर्ता, वार्ता विघ्नाची’ ही मराठी आरती अतिशय जल्लोषात गात असतात. अनेक मुसलमान, पारशी, शीख बांधव या उत्सवात हीरिरीने, उत्साहाने सहभागी होतात. त्या अर्थाने हा कोणत्या एका धर्माचा उत्सव राहिला नसून समस्त महाराष्ट्रवासींयांचा उत्सव झाला आहे. आजच्या गतिमान आणि तंत्राधिष्ठित युगात माणसाने माणसाला समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी गणेशोत्सवासारखा उत्सव फार मोठा हातभार लावू शकतो यात शंका नाही. आज पर्यावरणाचे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे असताना आपल्या कोणत्याही कृतीतून पर्यावरणाला धक्का लागू नये, याचे भान आपण जपले पाहिजे. सण हा पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त साजरा करुन त्यातून मिळणारी ऊर्जा ही पुढील काळासाठी सहाय्यक ठरते. त्यामुळे मानसिकतेत बदल करुन सणांची मजाही घ्या आणि पर्यावरण रक्षणाचा आनंदही घ्या.