मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यातल्या कोपरी इथल्या रेल्वे पुलाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचं लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, खासदार राजन विचारे, माजी खासदार आनंद परांजपे आदी मान्यवर उपस्थित होते. या पुलामुळे विशेषत: मुंबई-ठाणे प्रवासातल्या वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल. सध्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून आता दोन्ही बाजूंची वाहतूक या मार्गावरून वळवून दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण केलं जाईल. या नवीन बांधल्या जाणाऱ्या पुलाची लांबी ७९६ मीटर असून रेल्वेवरच्या पुलाची लांबी ६५ मीटर आहे आणि रेल्वे रूळांपासून त्याची उंची सुमारे साडेसहा मीटर. दोन्ही बाजूंना ४ मार्गिकांसाठीची रुंदी ३७.४ मीटर आहे. प्रकल्पात चारपदरी भुयारी मार्ग, चिखलवाडी नाल्याच्या महामार्गाखालचं बांधकाम आणि पादचारी पुलाची पुनर्बांधणी यांचा समावेश आहे.