मुंबई (वृत्तसंस्था) : देशातील लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं राज्य निवडणूक कार्यालयानं यंदाच्या नवरात्रीमध्ये लोकशाही भोंडला स्पर्धेचं आयोजन केलं आहे. लोकशाही आणि हुकूमशाही यातील फरक सर्वसामान्य जनतेला आधुनिक गाण्यांच्या माध्यमातून कळावा हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.या स्पर्धेतून स्त्रिया स्वत: तर आपल्या मताधिकारांचा, लोकशाही मुल्यांचा विचार करतीलच. परंतु स्त्रीला तिची मतदार म्हणून नावनोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणं यासारख्या कामांसाठी प्रेरित करणाऱ्या गीतरचनाही करता येतील. लोकगीतातील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे, निर्णयक्षम आहे हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून, गावाच्या, देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा असं आवाहन गीतांमधून करता येईल. स्पर्धेची अधिक माहिती ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.