नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत लसीच्या ९७ कोटी २३ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणाच्या काल २७३ व्या दिवशी देशात सुमारे आठ लाख ३६ हजार मात्रा देण्यात आल्या,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात गेल्या २४ तासात १५ हजार ९८१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या आठ दिवसांपासून देशात २० हजारांच्या नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.भारतात सध्या २ लाख एक हजार ६३२ उपचाराधीन कोविड रुग्ण असून गेल्या २१८ दिवसातली ही सर्वात कमी उपचाराधीन रुग्णसंख्या आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण सध्या शून्य पूर्णांक ५९ शतांश टक्के असून गेल्या गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यानंतरचं हे सर्वात कमी प्रमाण आहे. गेल्या २४ तासात देशात १७ हजार ८६१ कोरोना रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ३३ लाख ९९ हजार ९६१ वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ८ शतांश टक्के असून गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासूनचा हा सर्वाधिक दर आहे.