नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काशी महाकाल एक्सप्रेस ही आयआरसीटीसीची तिसरी खाजगी रेल्वेगाडी आजपासून सुरू होत आहे. इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमधलं काशी विश्वनाथ मंदीर या तीन ज्योतिर्लिंगांना या रेल्वे सेवेद्वारे जोडले जाणार आहे.
पहिली काशी महाकाल ट्रेन आज दुपारी वाराणसीहून सुटेल आणि उद्या दुपारी इंदूरला पोहोचेल. रात्रीच्या वेळी धावणारी ही आयआरसीटीसीची पहिली रेल्वे सेवा आहे.
या गाडीमध्ये उच्च दर्जाच्या सुविधा देण्याबरोबरच यामध्ये ओंकारेश्वरचं टूर पॅकेज असल्याची माहिती आयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी या गाडीला झेंडा दाखवला होता.
वाराणसीहून लखनौमार्गे इंदूरला येणारी गाडी एक हजार १३१ किलोमीटर अंतर कापेल. तर वाराणसीहून प्रयागराजमार्गे इंदूरला येताना ही गाडी एक हजार १०२ किलोमीटर अंतर कापेल. या प्रवासासाठी १९ तास लागतील.
मधुर भक्तीसंगीत, प्रत्येक डब्यात दोन खाजगी सुरक्षा रक्षक आणि केवळ शाकाहारी भोजन अशी या संपूर्णपणे वातानुकूलीत तृतीय श्रेणीच्या गाडीची वैशिष्ट्यं आहेत. वाराणसी आणि इंदूरदरम्यान ही गाडी आठवड्यातून तीन वेळा धावेल.