मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील नांदेड, जालना, वाशिम, हिंगोली, धुळे, परभणी, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांत परतीच्या पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील तळणी, मनाठा, निवघा, आष्टी, तामसा, पिंपरखेड कोंडलवाडी या सात महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. हदगाव तालुक्यात कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भागातील नदी नाल्यांना पूर आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात बरसलेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीन पीकाला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे जलसाठ्यांची पाणी पातळी वाढली असून वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. वाशिम तसंच बुलढाणा जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडला. पेन टाकळी प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळं जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैन गंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळं सरपखेड-धोडप आणि करडा-गोभणी हे दोन जिल्हा मार्ग बंद झाले असून पैन गंगा नदीकाठच्या 40 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धान, सोयाबीन, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. वाघूर धरणामधून 8 दरवाजांद्वारे 13 हजार 377 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.