नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत ‘बदलत्या हवामानाचे आव्हान’ या विषयावर ते बोलत होते. हजारो वर्षांपासून पृथ्वीवर सूर्यामुळे आणि सूर्यावरील सौर डागांमुळे हवामानामध्ये थंड, गरम किंवा अति पर्जन्य वृष्टी असे बदल वेळोवेळी होत असतात. या बदलामुळे मानवी जीवनावर आणि शेतीवर तथा शहरीकरणावर परिणाम होणार आहेत. अशा होणाऱ्या परिणामांचा वेळेआधीच अभ्यास करून समाजाला अगोदरच सुचित करता येतं, त्यासाठी हवामान अभ्यास चळवळ उभारावी लागेल, असं ते म्हणाले.