नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराला आळा घालणं शक्य आहे, असा विश्वास नागरिकांमध्ये गेल्या ६-७ वर्षात निर्माण करण्यात रालोआ सरकार यशस्वी झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सीव्हीसी अर्थात केंद्रीय सतर्कता आयोग आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांना प्रधानमंत्र्यांनी आज सकाळी व्हिडीओ संदेशाद्वारे संयुक्त संबोधित केलं. गुजरातमधल्या केवडीया इथं ही परिषद सुरु आहे. आता भ्रष्टाचार संपवण्याची राजकीय इच्छाशक्ती असून प्रशासकीय स्तरावर सतत सुधारणा केल्या जात आहेत. कुठल्याही दलालीशिवाय सरकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकतो, याची खात्री आता नागरिकांना पटत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्यासाठी समर्पित वृत्तीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी सीबीआय आणि सीव्हीसीच्या अधिकाऱ्यांना केलं. भ्रष्टाचार नागरिकांच्या हक्कांवर घाला घालतो आणि राष्ट्राच्या प्रगतीत अडसर ठरतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत असलेल्या सुलभतेविषयी त्यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांच्या जीवनातला सरकारी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, सरकारी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारनं उचललेली पावलं त्यांनी विशद केली. प्रधानमंत्री गतिशक्ति राष्ट्रीय मास्टर आराखडा निर्णय प्रक्रियेशी संबंधित अनेक अडचणी दूर करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.