नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत हा बौद्ध धम्माच्या विचारांचा केंद्रबींदू आहे, आणि कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन म्हणजे बौद्ध धम्माला वाहिलेली आदरांजली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश मधल्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं त्यानंतर प्रधानमंत्री बोलत होते. या विमानतळामुळे ही पवित्र भुमी जगाशी जोडली जाईल, बौद्ध धम्माशी निगडीत क्षेत्रांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या ७ वर्षात अमुलाग्र बदल झाला आहे, उडान योजनेंतर्गत ९०० हवाई मार्गांना मंजूरी दिली आहे, त्यातले ३५० मार्ग कार्यान्वीत झाले आहेत. ५० बंद असलेली विमानतळं आता सुरू झाली आहेत, असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.एअर इंडीयाच्या विक्रीमुळे हवाई क्षेत्राला उर्जीतावस्था प्राप्त होणार आहे. गती- शक्ती योजनेमुळे पायाभूत सुविधांमधे वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या आधी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया म्हणाले की भारत हा नेहमीच बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करतोय, त्यामुळेच भारतानं जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा मार्ग दाखवला. कुशीनगर विमानतळाचं बांधकाम विक्रमी दोन वर्षांच्या आत पूर्ण झालं,त्या साठी सिंदीया यांनी कर्मचाऱ्यांच कौतूक केलं. गेल्या ७० वर्षात भारतात केवळ ७४ विमानतळ उभारले गेले, मात्र गेल्या ७ वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्त्वामुळे ५४ नवीन विमान तळांची निर्मिती झाली, असंही सिदीया म्हणाले. त्या आधी श्रीलंका, म्यानमार, कंबोडीया, थायलंड, नेपाळ इथून १०० बौद्ध भिख्कू आणि पदाधिकारी कुशीनगर इथे आले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.