नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या १०० कोटींहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असले कोविड १९ विरोधातला लढा संपलेला नाही. त्यामुळे मास्कचा वापर करा, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवा आणि कोविड १९ विषयक दिशानिर्देशांचे पालन करा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
आज सकाळी देशवासियांना त्यांनी संबोधित केलं. आगामी सणासुदीच्या काळातही पूर्ण खबरदारी घ्या. कोविड १९ प्रतिबंधक लशीची एक मात्राही न घेतलेल्यांनी ती घ्यावी तर लसीकरण पूर्ण झालेल्यांनी इतरांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. तसंच सणासुदीच्या काळात स्थानिक वस्तुंची खरेदी करण्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना केला.
अधिकाधिक लोकांपर्यंत लस पोहोचावी यासाठी सरकारने नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन दिली. त्यामुळं लसीकरणात व्हीआयपी संस्कृती आली नाही आणि सर्वांना समान वागणूक मिळाली, याकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, देशातलं लसीकरण अभियान हे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. १०० कोटी लाभार्थ्यांचं लसीकरण हे कठीण आणि अतुलनीय उद्दिष्ट देशानं साध्य केलं आहे. यामध्ये देशानं चिंतेपासून विश्वासापर्यंतचा प्रवास केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. हे ध्येय साध्य करण्यात देशातल्या १३० कोटी नागरिकांचे प्रयत्न सामावले आहेत. हा केवळ आकडा नसून देशाच्या इतिहासातला नवा धडा आहे. नव्या भारताला कठीण कशी ध्येय ठेवायची आणि त्यांना साध्य कसं करायचे हे माहिती आहे, असंही ते म्हणाले. आतापर्यंत लशीच्या संशोधन आणि विकासासाठी आपण विकसित देशांवर अवलंबून होतो. पण जेव्हा शतकातली सर्वात मोठी साथ आली तेव्हा त्याच्याशी लढा देण्यात आपण कुठेही मागे नव्हतो.
विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देशाच्या लसीकरण अभियानाचा अविभाज्य हिस्सा होता. कोविन पोर्टलमुळे लशीसाठी नोंदणी करणं सोपं झालं आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही त्याची मदत मिळाली, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. कोरोना काळातही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सेंट्रल विस्टा, पीएम गती शक्ती यासारखे प्रकल्प सरकारने सादर केले. सध्या देशात केवळ विक्रमी गुंतवणूक होत नसून रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.