मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परिक्षेत अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षा देऊ शकले नाहीत. औरंगाबाद शहरात या परिक्षेसाठी अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आले, मात्र त्यांना केंद्रंच सापडली नाही. परिक्षा देण्यासाठी उमेदवारांना धावपळ करावी लागली. सकाळच्या सत्रातल्या परिक्षेला ५४ टक्के विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाही. पुणे आणि नाशिकमध्येही परीक्षेदरम्यान गोंधळ झाला. पुण्यात अबेदा इनामदार महाविद्यालयात बऱ्याच मुलांना हॉल तिकीटचा क्रमांक मिळाला नाही. नाशिक शहरालगत असलेल्या गिरणारे इथल्या परीक्षा केंद्रावर उशिरानं आणि अपूर्ण पेपर आल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी प्रत्यक्ष केंद्रावर भेट दिली आणि पेपर फुटला नसल्याची ग्वाही दिली. राज्यात इतरत्र ठिकाणी परिक्षा सुरळीत पार पडली.दरम्यान, आरोग्य विभागाच्या काल झालेल्या परीक्षेत तिसऱ्यांदा गोंधळ उडाल्याची टीका, भारतीय जनता पक्षानं केली आहे. या गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून, याची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली.