नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी-ट्वेंटी देशांच्या सोळाव्या शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इटलीमधे रोम इथं पोचले आहेत. त्यांच्या आज युरोपियन कॉन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वोन देर लेन यांच्याशी संयुक्त बैठक होईल. त्यानंतर ते पियाजा गांधीला रवाना होतील. तिथं महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहतील. संध्याकाळी इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्राघी यांच्याशी त्यांची बैठक होणार आहे. उद्या आणि परवा होणाऱ्या या परिषदेला जी-ट्वेंटीच्या सदस्य देशांचे तसंच युरोपिय संघ आणि इतर निमंत्रित देशांचे शासन प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघाचे प्रतिनीधी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यावर निघण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी विशेष निवेदन जारी केलं. त्यात, कॉप ट्वेंटी सिक्स अर्थात, हवामान बदलविषयक संयुक्त राष्ट्रांच्या करारात सहभागी असलेल्या देशांच्या २६ व्या परिषदेत आपण हवामान बदलाच्या समस्या सर्वंकष पद्धतीनं सोडवण्याची गरज अधोरेखीत करणार असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. कार्बनविषयक अवकाशाचं समन्यायी वाटप होण्याची गरज, तसंच हरित आणि सर्वसमावेशक विकासासाठी शाश्वत जीवनशैलीचं महत्व आपण या परिषदेत मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निसर्ग आणि संस्कृतीशी एकरुप होत जगणं ही भारताची परंपरा असल्यानंच, त्यात पृथ्वीविषयीचा प्रचंड आदर दिसतो. म्हणूनच भारतानं स्वच्छ आणि नवीकरणीय उर्जा व्यवस्था, उर्जा कार्यक्षमता वाढ, वनीकरण आणि जैव-विविधता या सगळ्याचा विस्तार करण्याच्यादृष्टीनं महत्त्वाकांक्षी उपाययोजना हाती घेतल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.