नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तूट येण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत होते. या महसुली तुटीचा राज्यातल्या विकास कामांवरही विपरित परिणाम होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

या आर्थिक संकटाचा शेतीवर होणारा ताण कमी करण्यासाठी कृषी कर्जाची पुनर्रचना, अल्पमुदतीच्या कर्जाचं मध्यम तसंच दीर्घ मुदतीच्या कर्जात रुपांतर, कर्ज परतफेडीचे हप्ते लांबवणं, पीककर्जाचा व्याजदर शून्य टक्के करावा, असे अनेक उपाय पवार यांनी सुचवले. उद्योग तसंच व्यापाराचं अर्थकारण सावरण्यासाठी अनुकूल निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन संपल्यानंतर बेरोजगारी आणि कुशल मनुष्यबळाचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.