नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातलं कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण ही फार मोठी कामगिरी असून संघराज्यातल्या सहकाराचा उत्तम नमुना असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. गावोगावात लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं असंही त्यांनी सांगितलं. दक्षिण विभागीय परिषदेच्या २९ व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावर काल तिरुपतीमध्ये ते बोलत होते. या बैठकीला आंध्रप्रदेश, कर्नाटक, पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री आणि केरळ, तमिळनाडू, तेलंगणाचे वरिष्ठ मंत्री आणि पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीपचे नायब राज्यपाल उपस्थित होते. प्रलंबित असलेल्या ५१ पैकी ४० मुद्द्यांवर या बैठकीत तोडगा निघाल्याचं शहा यांनी सांगितलं.