मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीनं सातव यांना पाठिंबा दिला होता. भाजपा उमेदवार संजय कणेकर यांनी अर्ज मागे घेतल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली. पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपाचे आभार मानले. राज्यातल्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी विविध उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. मुंबईत भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांनी अर्ज दाखल केला. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आज मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिका-यांकडे सादर केला. विधान परिषद द्वैवार्षिक निवडणुकीसाठी कोल्हापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून भाजपा उमेदवार आणि माजी आमदार अमल महाडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज, निवडणूक निर्णय अधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे दाखल केला.

अकोल्यातले उद्योजक वसंत खंडेलवाल यांनी भाजपाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिका-यांकडे सादर केला. महाविकास आघाडीच्या वतीने आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी उमेदवारी अर्ज आज जिल्हाधिका-यांकडे सादर केला.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत एकूण 821 मते असून भाजपकडे  244 मते आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर 190 मते काँग्रेसकडे आहेत. शिवसेनेकडे 130 राष्ट्रवादीकडे 76 असे तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीकडे 396 मते आहेत. तसेच अपक्षांच्या मतांची संख्या 171 इतकी आहे. वंचित बहुजन आघाडी कडे 75 मते असल्याने अपक्षांची आणि वंचितची मते कुणाच्या पारड्यात पडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्य विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आणखी दोन उमेवारांच्या नावाला मान्यता दिली. यानुसार कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विद्यमान आमदार सतेज पाटील तर धुळे-नंदुरबार मधून गौरव देवेंद्रलाल वाणी यांना पक्षाची उमेदवारी मिळणार आहे.