नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायूची गुणवत्ता सुधारण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था तसंच महानगरपालिकांचं योगदान महत्त्वाचं आहे असं मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींबरोबरच स्वयंसेवी संस्था, युवा वर्ग, विद्यार्थी या सर्वांना एकत्रितपणे वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करावे लागेल असंही ते म्हणाले. सध्या सुरु असलेल्या इंडो-जर्मन विकास सहकार्य अंतर्गत पुणे, नागपूर आणि सुरत शहरातलं वायू प्रदूषण कमी करण्याचा प्रकल्प राबवण्यात येतोय, अशी माहिती त्यांनी दिली. या शहरांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबवण्यास सज्ज करण्यासाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणे हा उद्देश आहे. भारताने पॅरिस परिषदेच्यावेळी अपारंपरिक उर्जास्रोतांद्वारे उर्जानिर्मितीचे उद्दिष्ट 40% पर्यंत निर्धारित केले होते, आज त्या उद्दिष्टापर्यंत आपण पोहोचलो आहोत, कार्बन उत्सर्जन कमी केले आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितलं. माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने एलईडी दिव्यांचा वापर वाढवण्यासंदर्भात केलेले कार्य कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि पंतप्रधानांनी निर्धारित केलेले देशभरात 36 कोटी एलईडी बल्बचे लक्ष्य साध्य करण्यात मोलाचे योगदान देईल, या शब्दात त्यांनी राज्याचं कौतुक केलं.२०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातल्या अर्ध्या आणि २०२७ पर्यंत उर्वरित सर्व बसचे रुपांतर इलेक्ट्रिक बसमध्ये करण्याचे नियोजन असल्याचं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. यामुळं मुंबईतली हवा स्वच्छ व्हायला मदत होईल असं ते म्हणाले.