नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी, देश त्यांना अभिवादन करत आहे. यानिमित्ताने देशभरात आज विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नवी दिल्लीत संसद प्रागंणात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी तसंच सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं.
बाबासाहेब हे महान समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरुष तसंच समाजाच्या वंचित घटकांचे मसिहा होते. जातव्यवस्था मोडून काढण्यात बाबासाहेबांनी महत्वाचं योगदान दिलं असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि शोषित जनतेच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार तसंच सामाजिक न्यायाचे प्रणेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं विचार आणि आदर्श करोडो देशवासियांना नेहमीच प्रेरणादायी ठरतील अशा शब्दात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविय यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आपण जे स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे. थोर विचारवंत, अभ्यासक, ज्ञानयोद्धे, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं आहे.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपुरातल्या दीक्षाभूमीवर आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दीक्षाभूमी परिसरात आंबेडकर स्मारक समितीनं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज धुळ्यात जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. सांगलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी केली होती. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिन तसच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर शहरातल्या आंबेडकर चौक इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. वाशिम शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त कँडल मार्च काढून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं.