मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे शासनाच्या महासंस्कृती आणि पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ‘पिफ’चे संचालक आणि दिग्दर्शक जब्बार पटेल, विश्वस्त मोहन आगाशे, उल्हास पवार,उपस्थित होते. चित्रपटांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई फिल्मसिटी येथे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येत आहेत अस देशमुख म्हणाले, पुढील वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ३ ते १० मार्च २०२२ या कालावधीत होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.