मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघात आज मतदान होत आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दुपारी २ वाजेपर्यंत ८९ टक्के मतदान झालं. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदार संघात बुलडाणा जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत ३८ पूर्णांक १५ शतांश  टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर वाशिम जिल्ह्यात २ वाजेपर्यंत ३२ पूर्णांक ७४ टक्के मतदान झालं. नागपूरमध्ये भाजपा चे चंद्रशेखर बावनकुळे यूनिवडणूक रिंगणात आहेत. तर शेवटच्या टप्प्यावर काँग्रेसनं छोटू भोईर यांची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख  याना पाठिंबा जाहीर केला आहे. अकोला-बुलडाणा -वाशीम मतदार संघात शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपाचे वसंत खांडेलवाल यांच्यात सरळ लढत होत  आहे.  कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, तसच मुंबईतील २ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील, धुळे-नंदुरबारमध्ये भाजपाचे अमरीश पटेल,मुंबईत शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपचे राजहंस सिंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.