मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, मंडळाच्या परीक्षा पारंपरिक नेहमीच्या पद्धतीनंच होतील, तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. अगदीच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर परीक्षांबाबतचा निर्णय शासनाच्या आदेशानुसार घेतला जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. मात्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बोर्डाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनं घेण्यावर मंडळ ठाम असल्याचं म्हटलं आहे. दरवर्षीप्रमाणे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान आयोजित करण्याच्या दृष्टीने मंडळानं तयारी सुरू केली आहे.