मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती इथं झालेल्या पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत, पल्लवी रामभाऊ खेडकर हीनं ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावलं. पल्लवी खेडकर ही राजूर इथल्या एम.एन.देशमुख महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. यामुळे तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठीही निवड झाली असल्याची माहिती कुस्ती प्रशिक्षक तानाजी नरके यांनी दिली. हरयाणा इथं पुढच्या वर्षी ३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पल्लवी सहभागी होईल असं त्यांनी सांगितलं. मूळची पाथर्डी गावातली रहिवासी असलेल्या पल्लवीचे आईवडील हे उसतोड कामगार आहेत. राजूर इथल्या साई कुस्ती केंद्रात तीनं प्रशिक्षण घेतलं आहे. हे केंद्र दिल्लीतल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणांनं दत्तक घेतलेलं आहे.