मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर भारताकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भासह अमरावती जिल्ह्यातला पारा घसरल्यानं या भागात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. येत्या काही दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून, विदर्भात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली आहे.
हिमालयात बहुतांश ठिकाणी बर्फ वृष्टी होत आहे त्यामुळे पुढील पाच दिवस विदर्भात किमान तापमान घटण्याची शक्यता आहे. २३ डिसेंबरपर्यंत विदर्भातील किमान तापमान ८ ते १० अंश सेल्शियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सांगितलं. नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानाचा पारा १२ पूर्णांक ५ अंश सेल्शियसपर्यंत घसरला आहे. जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही थंडीचं प्रमाण वाढलं आहे.