नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरुपानं बाधित देशभरातल्या रुग्णांची संख्या ९६१ झाली आहे. यापैकी सर्वाधिक २६३ रुग्ण दिल्लीतले आहेत, तर २५२ रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. देशभरात आत्तापर्यंत २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे. आजवर आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांपैकी ३२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान देशात काल अनेक दिवसानंतर १० हजाराहून अधिक १३ हजार १५४ इतक्या नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ७ हजार ४८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आत्तापर्यंत देशभरातले ३ कोटी ४२ लाख ५८ हजाराहून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोना मुक्तीदर किंचित घसरून ९८ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशभरात ८२ हजार ४०२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.